स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुनावणीला तारिख पे तारिख


नवी दिल्ली, 01 : गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत. राज्यात सातत्याने राजकीय भूकंप होत असल्याने याचा परिणाम हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुका नेमक्या कधी होणार? असा प्रश्न सगळ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याच प्रकरणावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार होती. परंतु आता पुन्हा एकदा या सुनावणीवरील तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु पुढील सुनावणी ही नेमकी कधी होणार? याबाबतची तारिख कोर्टाकडून सांगण्यात आलेली नाही. (When will the Supreme Court hear the Local Self-Government elections?)

सुप्रीम कोर्टात आज (ता. 01 ऑगस्ट) 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुनावणी करण्यात येणार होती. परंतु न्यायालयाकडे या प्रकरणापेक्षा इतर मोठी प्रकरणे सुनावणीसाठी असल्याने या प्रकरणावरील सुनावणी आज होऊ शकली नाही. परंतु, मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचनेच्या संदर्भातील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली.

मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017 च्या मनपा निवडणुकीप्रमाणे एकूण 227 वॉर्ड होते. परंतु मविआचे सरकार असताना त्यांनी वॉर्ड रचनेत बदल करण्याचा निर्णय घेत वॉर्डची संख्या 236 केली. परंतु 2022 मध्ये राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर सत्तेत आलेल्या युतीच्या सरकारने हा निर्णय बरखास्त केला. त्यामुळे हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. पण आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारकडून तीन आठवड्यांचा वेळ हा वाढवून मागितला आहे. तर दुसरीकडे सर्वांना प्रतिक्षा असलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुनावणीला तारिख पे तारिख मिळत असल्याने निवडणुका कधी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भविष्य हे अंधारात असताना अनेकांनी 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक आमदारांनी आत्तापासूनच वरिष्ठांकडे तिकीट मिळविण्यासाठी लॉबिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें