शहापूर, ठाणे, वृत्तसेवा, दी. 01 ऑगस्ट : समृद्धी महामार्ग झाल्यापासून येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. अनेक कुटूंब या अपघातामध्ये उद्ध्वस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा मोठा अपघात झाला होता. अशात आता समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना पुलावरील ग्रेडर-मशिन कोसळून मोठा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात १० कामगार मृत्यूमुखी पडले हि संख्या वाढण्याची शक्यता आहे तर ३ पेक्षा अधिक जखमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही दुर्घटना सोमवारी मध्यरात्री ही शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.
मशिनखाली आणखी कामगार दबलेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटना स्थळी बचाव कार्य सुरु असून त्यांना काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती शहापूर पोलिसांनी वृत्तमाध्यमांना दिली आहे. काम सुरू होते तेव्हा ३० ते ४० कामगार घटनास्थळी होते. त्यामुळे पोलिसांनी मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
पुलाच्या बांधकामात वापरले जाणारे ग्रेडर लॉन्चिंग मशीन, हे मशीन एक विशेष उद्देशाची मोबाइल गॅन्ट्री क्रेन आहे, जी पुलाच्या बांधकामात वापरली जाते. हे हायवे आणि हाय-स्पीड रेल्वे ब्रिज बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रीकास्ट बॉक्स ग्रेडर स्थापित करण्यासाठी वापरले जाते. समृद्धी महामार्गाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे.
