पुन्हा पुरात वाहून गेला रहदारीचा पर्यायी रस्ता

  • बोळुंदा, थाडेझरी गावांचा कोसमतोंडी गावाशी संपर्क तुटला…

सडक अर्जुनी : दि. 01 ऑगस्ट : तालुक्यतील ग्राम कोसमतोंडी -बोळुंदा -थाडेझरी या तीन गावांना जोडणारा पूल पुन्हा पुराच्या पाण्याने वाहून गेला. यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी व शेतकरी यांचे हाल होत आहेत. ‌ ‌

जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी -बोळुंदा -थाडेझरी या तिन्हीं गावांना जोडणा-या एकमात्र पुलाचे बांधकाम मागिल सहा महिन्यापासून सुरू आहे. पुलाचे अर्धवट राहिलेल्या कामामुळे १६ जुलै ला झालेल्या संततधार पावसामुळे रहदारीचा पर्यायी रस्ता वाहून गेला होता.

पर्यायी रस्ता वाहून गेल्यानंतर संबंधित कंत्राटदार व संबंधित विभागाने तात्पुरता पर्यायी रस्त्याची डागडुजी करून पर्यायी रस्ता सुरू करून दिला. मात्र आज दि. २८ जुलै ला रात्री व सकाळी आलेल्या मुसळधार पावसाने नाल्याला पुर आल्याने पुन्हा पर्यायी रस्ता वाहून गेला.

त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुरात पर्यायी रस्ता वाहून गेला, याबाबत नागरिकांनी संबंधित कंत्राटदारांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता कंत्राटदाराने भ्रमणध्वनी उचलला नाही. कोसमतोंडी गावाशी बोळुंदा, थाडेझरी गावांचा संपर्क तुटला असून आता तात्पुरता पर्यायी रस्ता वाहून गेल्याने शेतीची कामे करण्यास अडचण निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने व कंत्राटदाराने त्वरीत उपाययोजना करून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

‌ ‌‌पूलाचे बांधकाम सहा महिन्यापासून सुरू आहे. कंत्राटदाराने पुलाचे बांधकाम संथगतीने केल्याने बांधकाम अर्धवट आहे. पर्यायी रस्ता पहिल्याच पुरात वाहून गेला होता. आणि आता पुन्हा पुराने पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. जाण्याचा एकमेव मार्ग बंद असल्याने विद्यार्थी, नागरिक व शेतक-यांना मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने व कंत्राटदाराने त्वरीत रस्त्याची सोय करावी. ‌ : नीशा गिरीधर काशिवार पं.स. सदस्या सडक अर्जुनी. ‌ ‌‌

कोसमतोंडी -बोळुंदा -थाडेझरी मार्गावर पुलाजवळील तात्पुरता पर्यायी रस्ता पुन्हा वाहून गेल्याने ये-जा करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत कंत्राटदारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता कंत्राटदाराने भ्रमणध्वनी उचलला नाही. तसेच पर्यायी रस्ता पुन्हा वाहून गेल्याचे संबंधित विभागाचे उपअभियंता यांचेशी संपर्क साधला असता वाहून गेलेल्या रस्त्याचे फोटो पाठविण्यास सांगितले. या कामाची चौकशी करून पर्यायी रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण करावे. ‌‌: ‌संजय मधुकर काशिवार शेतकरी कोसमतोंडी/बोळुंदा. ‌ ‌


 

Leave a Comment

और पढ़ें