- पक्षी विश्वातील अनोखा व्यवहार 7 वर्षा नंतर कॅमेऱ्यात कैद गोंदिया जिल्यातील पक्षी निरीक्षक शरद गजभिये याला मिळाली संधी.
गोंदिया, दिनांक : ३० जुलै : पशुपक्ष्यांमधील प्रेम, स्नेहाचे व्यवहार कधी-कधी मानवांनाही अचंबित करतात. असाच एक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील पांगडी परिसरात गोंदियातील पक्षिमित्रांच्या निरीक्षणात नोंदविला गेला आहे. स्वर्गीय नर्तक या अतिशय देखण्या पक्ष्याच्या पिल्लांना चष्मेवाला हा पक्षी चक्क त्यांच्या घरट्यात येऊन अन्न खाऊ घालतो अन् विष्ठाही साफ करतो. हे दृश्य कॅमेराबद्ध केले आहे गोंदियातील पक्षी प्रेमी शरद गजभिये यांनी.
स्वर्गीय नर्तक या पक्ष्याचे दर्शन व्हावे असे प्रत्येक पक्षी निरीक्षकाचे स्वप्न असते. गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या पांगडी च्या जंगलात स्वर्गीय नर्तक पक्ष्याचे वावर असल्याचे पक्षी मित्र शरद गजभिये यांनी सांगितले आहे. शरद गजभिये हे पक्षीप्रेमी असून ते आपला छंद म्हणुन जंगल परिसरात जाऊन पक्ष्यांचे निरीक्षण करीत असतात. पांगडी परिसरात त्यांना एका निंबाच्या झाडावर स्वर्गीय नर्तक या पक्ष्याचे घरटे दिसले त्यामध्ये चार पिल्ले होती. या पिल्लांचे माता-पिता हे त्याच झाडाच्या वरच्या बाजूला बसून सतत आवाज करीत होते. गजभिये यांनी घरट्याच्या जवळ झाडाच्या पाठीमागे बसून घरट्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. तब्ब्ल पंचे चाळीस मिनटंनंतर चष्मेवाला ( Indian White Eye) नावाचा पक्षी आपल्या चोचीत एक कीटक घेऊन घरट्याच्या विरुद्ध दिशेच्या फांदीवर येऊन बसला.
१५ मिनिटानंतर तो त्या घरट्याजवळ आला. या चारही पिल्लांनी घरट्यातून आपली मान उंचावित या पक्ष्याच्या दिशेने चोच उघडून आवाज केला, लगेच या पक्ष्याने आपली चोच एका पिल्लाच्या चोचीत टाकून त्याला ते कीटक खाऊ घातले. अन् घरट्यातील एका पिल्लाच्या मागच्या बाजूने त्याची पांढरी विष्ठा आपल्या चोचीत घेऊन उडून गेला. पिल्ले स्वर्गीय नर्तकाची अन् खाऊ घालतो चष्मेवाला असा अजब प्रकार पाहून पक्षिमित्र चांगलेच भारावून गेले . चष्मेवाला पक्ष्याने जवळपास चार ते पाच वेळा अशाच प्रकारे अन्न भरविले व पिल्लांची विष्ठा साफ केली. निसर्ग नियमानुसार जे काम या पिल्लांच्या आई-बाबांनी करायला पाहिजे होते. ते सर्वच काम हा वेगळ्या प्रजातीचा पक्षी करीत असल्याचे कॅमेराबद्धही करण्यात आले आहे.
तर आपल्या सहकारी पक्षी मित्राला स्वर्गीय नर्तक आणि चष्मेवाला पक्ष्याचे एकत्र अनोखे दर्शन झाल्याणी गोंदिया जिल्यातील निसर्ग प्रेमी पक्षी प्रेमिनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तर या आधी वर्ष 2016 मध्ये अशी अनोखी नोंद गुजरात राज्यात करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यात पहिल्यादच अशी नोंद झाल्याचे पक्षी प्रेमी त्र्यंबक जरोदे व शरद गजभिये पत्रकारांशी बोलताना सांगत होते.