मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०५ जुलै : मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर लघवी केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्ते प्रवेश शुक्ला याला अटक केली आहे. प्रवेश शुक्ला याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी प्रवेश शुक्ला याच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाई अंतर्गत प्रवेश शुक्ला याच्या घरावर बुलडोजर चालविण्यात येणार आहे.
प्रवेश शुक्ला याच्या अटकेनंतर नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांसमोर येत ही माहिती दिली आहे. ‘सिधी येथे जे घडले ते अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी एनएसए कायद्या (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत त्याच्या घरावर बुलडोजर चालवला जाणार आहे’, असे नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. प्रवेश शुक्ला याचा आदिवासी तरुणावर लघवी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर एस्सी एसटी कायद्या अंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे.
