तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 300 वाहनाच्या ताप्यासह महाराष्ट्रात!


मुंबई, वृत्तसेवा, दिं. 26 जुन : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आपल्या भारत राष्ट्र समितीचा (BRS) महाराष्ट्रात विस्तार करायचा आहे. या पार्श्वभूमीवर केसीआर दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर त्यांच्यासोबत ३०० गाड्यांच्या ताफ्यासह आख्खं मंत्रिमंडळ आणि सर्व आमदार आज सोलापूरात दाखल होणार आहे.

ऍग्रोवन च्या वृत्तानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी लोकसभा निवडणूक २०२४ डोळ्यासमोर आपल्या पक्षाच्या देशभर विस्तार करण्याचा आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात विशेष लक्ष्य दिले असून मागील काही महिन्यांपासून त्यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत. अब की बार किसान सरकार असा नारा देत त्यांच्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूरमध्ये जाहीर सभा घेतल्या. यावेळी महाराष्ट्रातील अनेक माजी आमदारांनी बीआरएसमध्ये प्रवेशही केला.

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरात दाखल होत असल्याने त्यात केसीआर यांनी बीआरएसला महाराष्ट्रभर पोहोचवण्याची संधी शोधली आहे. दोन दिवस ते सोलापूर आणि पंढरपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यासाठी महिन्याभरापूर्वीच सोलापूर आणि परिसरातील अनेक हाॅटेल बुक करण्यात आली होती.

केसीआर आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळातील मंत्री, सर्व आमदार आणि खासदारांसह सोलापूरच्या दिशेने बसने रवाना झाले आहेत. ३०० गाड्यांचा ताफा सायंकाळी ६ वाजता सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर मंगळवारी ते मंत्रिमंडळासह पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. पंढरीत ते संत ज्ञानेश्वर माऊल आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार आहेत. पण अद्याप त्यांना परवानगी मिळाली नाही.

पंढरपूरानंतर त्यांची सरकोली येथे जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कै. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता ते तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेचार वाजता ते तुळजापूरहून हैदराबादला रवाना होणार आहे. बीआरएसच्या पक्ष बांधणीसाठी करत असलेल्या केसीआर यांच्या पंढरपूरातील शक्तिप्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें