मी भाजपची, पण भाजप माझा पक्ष नाही – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे


संग्रहित छायाचित्र


दिल्ली, वृतसेवा, दिनांक : ०२ जून : मी भाजपची, पण भाजप माझा पक्ष नाही. मी एक कार्यकर्ती आहे. वडिलांशी भांडण झाले तर मी भावाच्या घरात जाईन, असा निर्वाणीचा इशारा देत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद पक्षाचे ज्येष्ठ नेते पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समक्ष बोलून दाखवली. विधानसभेतील पराभवानंतर राज्याच्या राजकारणातून काहीशा बाजूला ढकलले गेल्याने पंकजा मुंडे राज्यातील भाजप नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कमालीच्या नाराज आहेत. त्यातच खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांचे लोकसभेच तिकीट कापले जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर संधी मिळेल त्यावेळी पक्षात होणारी घुसमट उघडपणे व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजप माझा पक्ष नाही, असे सांगत स्वपक्षातील नेत्यांनाच घरचा आहेर दिला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रासपचे नेते महादेव जानकर उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात महादेव जानकर यांनी तुमचा भाजप हा जनहितकारी पक्ष नाही, अशी टीका केली होती. हाच धागा पकडत पंकजा मुंडे म्हणाल्या, पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी ? मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप हा मोठा पक्ष आहे.

मी महादेव जानकरांच्या नेहमी संपर्कात असते. त्यांच्या रासप पक्षालाही मी नेहमी वेळ देत असते. जानकर, तुम्ही या विषयावर बोला, त्या विषयावर पत्रकार परिषद घ्या अशा सूचना मी नेहमी त्यांना देत असते. रासप पक्ष हा माझ्यासाठी माहेरासारखाच आहे, तर भाजप पक्ष वडिलांसारखा आहे. वडिलांकडे काही झालंच तर माहेरच्या पक्षामध्ये माझ्यासाठी जागा आहेच ना, असे थेट वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी रासपमध्ये जाण्याचे संकेत दिले. मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे मुंडे परिवाराच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही.


 

Leave a Comment

और पढ़ें