मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे : समीर वानखेडे, एनसीबी


मुंबई, वृतसेवा, दिनांक : १४ मे २०२३ : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला सोडण्यासाठी शाहरुखकडे 25 कोटींची लाच मागितल्याने आयआरएस अधिकारी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबईतील तत्कालीन संचालक समीर वानखेडे व अन्य दोन अधिकारी गोत्यात आले आहेत.

याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून 29 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. याबाबत आता समीर वानखेडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मला देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय, असे ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि 12 तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. माझ्या घरातून त्यांना 18 हजार रुपये रोख आणि मालमत्तेसंदर्भातील काही कागदपत्रे सापडली आहे. सदरची मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला, मात्र त्यांना काहीही सापडले नाही. सीबीआयच्या 7 अधिकाऱ्यांच्या आणखी एका पथकाने माझ्या सासरच्या मंडळींच्या घरीही छापेमारी केली. माझे सासू-सासरे दोघंही वृद्ध आहेत.

दरम्यान, ऑक्टोबर 2021 मधील हे प्रकरण आहे. कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकून ‘एनसीबी’ ने आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. या सर्वांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, अटकेतील आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची लाच मागण्यात आल्याचा आरोप ‘एनसीबी’ च्या पंचानेच केल्याने खळबळ उडाली होती. याच प्रकरणात वानखेडे गोत्यात आले आहेत. त्यांच्यासह इतरांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. वानखेडे यांचे घर तसेच अन्य मालमत्तांवर सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. इतर आरोपींच्या मालमत्तांवरही छापे टाकले गेले आहेत.

2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्ज प्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हाचे ‘एनसीबी’चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. ‘एनसीबी’ने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवले होते, पण पुराव्याअभावी आर्यन खानची सुटका झाली होती.

या प्रकरणातील ‘एनसीबी’ चे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची लाच मागण्यात आली. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देण्यात येणार होते. 50 लाख रुपये टोकन म्हणून घेण्यात आले, असा दावा साईल यांनी केला होता. त्याची गंभीर दखल घेत ‘एनसीबी’ च्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्याच प्रकरणात आता ‘एनसीबी’ ने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून सीबीआयने छापेमारी केली आहे.

लाच प्रकरणात या अधिकाऱ्यांवर गुन्हा

– समीर वानखेडे, आयआरएस (माजी मुंबई विभागीय संचालक, एनसीबी)
– विश्वविजय सिंह (तत्कालीन अधीक्षक, एनसीबी)
– आशीष रंजन (तत्कालीन गुप्तचर अधिकारी, एनसीबी)
– के. पी. गोसावी (खासगी व्यक्ती)
– सानविल डिसोझा (खासगी व्यक्ती)

सीबीआयने समीर वानखेडे व इतर आरोपींच्या 29 ठिकाणांवर धाडी टाकल्या. मुंबई, दिल्ली, रांची, लखनौ, चेन्नई आणि गुवाहाटी आदी शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून त्यात रोकड, दस्तावेज व अन्य सामग्री मोठय़ा प्रमाणात जप्त केली गेली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें