चित्रदूर्ग मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०२ : कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री उशीरा कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्यावर अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असून वैदयकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालया समोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.



रात्री अटक करण्यात आल्यानंतर त्यांना चित्रकुट जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज न्यायालयीन कामकाज सुरु झाल्यानंतर पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कायदा आणि सुव्यवस्था ) आलोक कुमार यांनी शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती दिली.



तसेच शिवामूर्ती मुरघा शरानारू यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना रात्री साडेतीन वाजता चित्रदूर्ग येथील तुरुंगामध्ये आणण्यात आलं. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्याविरोधात दोन अल्पवयीन मुलींनी मैसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शिवामूर्तींविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मठाच्या माध्यमातून चालत असलेल्या शाळेतील दोन मुलींवर १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ यादरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

त्यानंतर या पीडित मुलींनी मठातून पळ काढत कोट्टनपेट पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने या मुलींनी या मठाधीशांविरोधात मैसूरच्या नाझारबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या शिवामूर्तींविरुद्ध लुकआऊट नोटीस जाहीर केली होती. अखेर पोलिसांनी शिवामूर्तींना अटक केली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात रचलेलं कटकारस्थान आहे. याप्रकरणात लवकरच निर्दोषत्व सिद्ध करु, असे शिवामूर्ती यांनी म्हटलं आहे.


 

Leave a Comment