सौंदड, ( भामा चूर्हे ), सडक अर्जुनी, गोंदिया, ता : 13 ऑगस्ट 2022 : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी ( रयत ) ग्रा.प. अंतर्गत शिवनगर डोमाटोला गावात स्वांतंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिन अमृतमहोत्सव म्हणून साजरा करित असून शिवनगर डोमाटोला गावात आजही अंधारात आहे. गावात अजूनही वीजेची सोय उपलब्ध करण्यात आली नाही. या गावाची लोकसंख्या ५२ असून गावात ११ घरे आहेत. त्यात तीन लोकांचे घरी शौचालय असून आठ घरी शौचालयाची सोय नाही. सन २०२१-२२ मध्ये आठ लोकांना घरकुल योजनेंतर्गत घरकुल देण्यात आले.
तर तीन घरे झोपडीतच आहेत. सन २००९ ते २०१६ पर्यंत पिण्याचे पाणी ५०० ते६०० मी. राज्यमार्गावर असलेल्या कोरेटोली येथून पाणी आणत होते. पण सन २०१६-१७ मध्ये जि.प.सदस्य रचनाताई गहाणे यांनी बोअरवेलची सोय करून दिली. सन २०१६ मध्ये व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वनसमिती नवेगावबांध मार्फत गॅस सिलिंडर देण्यात आले. उज्वला योजने अंतर्गत १२ गॅस सिलिंडर मोफत सेवा दिली.
मात्र सन २०१८ पासून मोफत गॅस सिलिंडर ची सेवा बंद केल्याने पूर्ववत चुलीवर स्वयंपाक करण्याची पाळी आली. सन २००९ पासून शिवनगर डोमाटोला गावातील लोकांना अंधारात राहावे लागते. गावालगत शेतशिवारात विद्युत लाईन गेली असून घराला लागून १० मी. वर विद्युत खांब असूनही गाव अंधारात आहे. शिवटोली वरून ४०० मी. वर कोहमारा-नवेगावबांध राज्यमार्ग असून रोडावर जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागते.
गावातील मुले-मुली ८ किमी. अंतरावर शिक्षण घेण्यासाठी सायकलने शाळेत जातात. पण कोरेटोली-शिवनगर ४०० मी. मध्ये चिखलाचा मार्ग असल्याने राज्यमार्गावरील कोरेटोली वर घरी पायी जावे लागते. या कारणाने शिवनगर डोमाटोला गाव विकासापासून कोसो दूर आहे. याकडे लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा यांचेकडून या गावातील लोकांची उपेक्षा केली आहे.
सदर गाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असून ग्रा.प.कार्यालयापासून ५ किमी.लांब आहे. या ग्रा.प.अंतर्गत चालना कोडका ७ किमी., खोली ८ किमी. अंतरावर आहे. पांढरवाणी ( रयत ) ४ किमी., पांढरवाणी झोडेटोली ६ किमी.,वाटगुळे टोली ४ किमी. आहे. या ग्रा.प . ने १३ वर्षात फक्त आवास योजनेंशिवाय कसल्याही शासकीय योजनांचा लाभ दिला नाही.
११ पैकी तीन कुटूंबाकडे शौचालय आहेत. उर्वरित ८ कुटूंबाकडे शौचालयाची सोय नसल्याने उघड्यावर शौचास जावे लागते. सदर गावालगत नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्पाची सिमा असून रात्री बेरात्री जंगली वन्यप्राण्यांचा उपद्रव असतो. मात्र, अर्जुनी मोरगाव पंचायत समिती ने सन २०१९ मध्ये गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमईवार यांनी आपल्या पंचायत समिती मधील ग्रामीण भागात शासकीय योजनेचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दाखवून ७२ व्या स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमईवार यांचा सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
पण अशा कर्तव्यदक्ष अधिका-याला हे गाव निर्दशनास कां आले नाही ? असे काम कागदोपत्री दाखवून लोकप्रतिनिधी आपल्या जवळील अधिका-यांची शिफारस करून स्थानिक सभापती प्रोत्साहित करतात. मात्र आजही देश ७५ वा स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करिता असतांनाच स्वातंत्र्यानंतरही शिवनगर डोमाटोला गावात वीज पोहचू शकली नाही. हे या गावाचे दुर्दैव आहे. आजही गावात शासनाच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नसून पाण्याचे नळ, शौचालय व रोड रस्त्याची सोय करण्यात आली नाही. आजही गाव पारतंत्र्यात असून या गावाला स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यामुळे सदर गाव विकासापासून कोसो दूर आहे.
उज्वल भारत, उज्वल भविष्य-पाॅवर @२०४७ हा कार्यक्रम राबवून प्रकाशगंगेमुळे घरोघरी विकासगंगा आजादी का अमृतमहोत्सवांतर्गत””उज्वल भारत ,उज्वल भविष्य-पाॅवर @२०४७ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय , नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील महावितर, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांचे संयुक्त विद्यमाने २६ जुलै ला या योजनेचा सुभारंभ मोठ्या थाटात आ. सहसराम कोरोटे, आ. मनोहर चंद्रीकापूरे यांचे हस्ते करण्यात आले.
या ऊर्जा उत्सवात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळालेल्या, त्यासयोजनांचा लाभ कशाप्रकारे सर्वसामान्य घेता येईल, असे या कार्यक्रमात सांगण्यात आले. या प्रकाशगंगेमुळेच विकास गंगा घरोघरी पोहचली असे प्रतिपादन केले होते.
मात्र आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांचे मतदारसंघातील शिवनगर डोमाटोला गावात अजूनही वीज पोहचली नसून आजही गाव अंधारात आहे. तसेच पिण्याचे पाण्याची सोय, शौचालय व रोड रस्त्याची कामे झाली नाही. तसेच मतदार संघातील दुर्गम भागातील घरापर्यंत वीज पोहचविण्याचे काम झाले नाही. आणि सांगतात की, प्रकाशगंगेमुळेच घरोघरी विकास गंगा पोहचली. विकासाची गंगा घरोघरी पोहचवायची असेल तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनी शिवनगर डोमाटोला गावात वीज पुरवून गाव अंधारमुक्त करून विकासाची गंगा सुरू करावी.