कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रपटा दोनदा गेला वाहून


  • खजरी-गिरोला रस्त्यावरील पुलाचे बांधकाम…

सौंदड, ( भामा चू-हे ), सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 08 ऑगस्ट 2022 : तालुक्यातील खजरी, गिरोला मार्गावर साखळी क्र. ३.७०० मध्ये मोठ्या ( बुडीत ) पुलाचे बांधकाम सुरू आहे. तालुका ठिकाणी जाण्यासाठी एकमेव मार्ग असून या मार्गावर खोडशिवनी, म्हसवानी चुलबंद नाल्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आशिया विकास बँक ( ABD ) अर्थसहाय्य अंतर्गत ३५४.७७ लक्ष खर्च करून नवीन पुल बांधण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.

या चुलबंद नाल्यावरील जुने पुल पाडून नवीन पुलाचे बांधकाम ३० मार्च २०२२ ला सुरू करण्यात आले. सदर कामाचे कंत्राट हे उदयकुमार प्रमर गोंदिया हे करीत आहेत. कार्यकारी यंत्रणा कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था गोंदिया यांचे देखरेखीत काम होत आहे. मात्र कंत्राटदाराचे मनमर्जी कारभारामुळे या पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग मागिल दिड महिन्यांपासून बंद आहे.

त्यामुळे नागरिकांना तालुका मुख्यालयी जाण्यासाठी २० किमी. लांब अंतरावरून प्रवास करावा लागतो. सदर पुलाची लांबी ५०.०० मीटर असून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. संबंधित कंत्राटदाराने मार्च महिन्यात पुलाचे बांधकाम करतांनी नागरिकांना जाण्या-येण्यासाठी बाजुला पर्यायी रपटा तयार केला. परंतू सदर रपटा पहिल्याच पावसाचे पूराने वाहून गेला. कंत्राटदाराने नाल्यांमध्ये लहान लहान पाईप टाकून ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ता बनविला होता.

पण पावसाळ्यात आलेल्या पावसामुळे दोनदा कच्चा रस्ता वाहून गेल्याने ही वेळ उध्दभवली असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्याच्या कामासाठी कोसमतोंडी, धानोरी, बोंळूदा, थाडेझरी, मुरपार, लेंडेझरी, बेहळीटोला, हेटी, गिरोला आणि या मार्गावर येणाऱ्या गावातील नागरिकांना तालुक्याच्या कामासाठी एकमेव मार्ग असून या मार्गाने ये-जा करावे लागते. पण कंत्राटदाराचे व लोकप्रतिनिधींचे निष्काळजीपणामुळे पावसाळ्यात पावसाचे पाण्याने दोनदा सदर कच्चा रस्ता वाहून गेल्याने आजही तालुक्यात जाण्यासाठी सातलवाडा, सौंदड व्हाया सडक अर्जुनी १५ किमी. जास्तीचा प्रवास करावा लागतो.

मागिल दोन महिन्यांपासून नागरिक व शाळकरी मुलांना शासकीय कामासाठी जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. सदर पुलाचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी पांढरी-कोसमतोंडी मार्गावरील सितेपार व मुंडीपार (ई) ते घटेगाव या मार्गावर या तिन्ही पुलाचे काम मार्च महिन्यात सुरू झाले. सितेपार व घटेगाव पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी पाण्याच्या प्रवाहाच्या हिसोबाने मोठे पाईप टाकून ये-जा करण्यासाठी रपटा तयार केला. त्यामुळे हे रपटे वाहून गेले नाही. वआजही या मार्गाने ये-जा सुरळीत सुरू आहे.

मात्र खजरी-गिरोला मार्गावरील खोडशिवनी-म्हसवानी चुलबंद नाल्यावरील पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांने पाण्याच्या प्रवाहाचा योग्य अंदाज न लावता रपटा तयार करतांनी लहान लहान पाईप टाकून कच्चा रस्ता बनविला. त्यामुळे पहिल्याच पावसात रपटा वाहून गेला. नंतर पुन्हा लोकप्रतिनिधी यांनी कंत्राटदाराला रपटा तयार करण्यास सांगितले व रपटा तयार केला. पण हा सुद्धा रपटा पावसाने वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना तालुका मुख्यालयी जाण्यासाठी अडचण होत आहे.


 

Leave a Comment