अर्जुनी मोरगाव, गोंदिया, दिनांक 10 नोव्हेंबर 2021 – तालुक्यातील झाशीनगर येथे दिवसाढवळ्या एका घरामध्ये बिबट्याने बस्तान मांडले. कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यावर शेजारील युवक धावून आले. बिबट्याला हाकलून लावण्याच्या प्रयत्नात गावातील दोन युवक जखमी झाले. घटनेची माहिती पवनी वनविभागाला दिली असता वनविभागाचे कर्मचारी तब्बल तीन तास उशिरा पोहचले.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील झाशीनगर येथे महिन्याभरापासून बिबट्याचा धुमाकूळ आहे. स्थानिक रामदास काळे यांच्या घरात बिबट्या बस्तान मांडून होता. कुटुंबियांनी आरडा ओरडा केला असता शेजारील दोन युवकांनी बिबट्या ला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले. राजकुमार राणू मडावी (32) आणि गोविंदा मोतीराम प्रधान (33) जखमींचे नाव आहे. जखमींना नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या बिबट्याने गावातील जनावरांना लक्ष केले आहे.
गाई, बैल, बकऱ्या, कोंबड्या मारून फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात वन्यजीव आणि मानव संघर्ष नेहमीचा झाला आहे. जंगल परिसराला लागून असलेल्या गावांमधील पाळीव प्राण्यांसह नागरिकांना जंगली हिंस्र पशूं टार्गेट करीत आहेत. वनविभाग मात्र वन्यजीवांच्या बंदोबस्ता बाबत हतबल दिसून येत आहे. हिंस्र वन्यजीवांचा वनविभागाणे बंदोबस्त करावा आणि जखमींना शासकीय मदत मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.