मुंबई, वृत्तसेवा दिनांक 08 : राज्यात सुरु असलेल्या एसटी संपावर तोडगा म्हणून आज दूपारी ३ वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यात त्रिसदस्यीय समिती स्थापन करुन या समितीपुढे कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आणि मागण्या आहेत त्या मांडाव्यात आणि त्यावर १२ आठवड्यांच्या आत तोडगा काढावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच याबाबतच्या बैठकीचा ठळक वृत्तांत (मिनिट्स) सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या सगळ्यावर न्यायालयात संध्याकाळी पुन्हा सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारकडून मुख्य सचिव देशाबाहेर असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यावर फटकारत सरकारचे प्रतिनिधी कुठेही असू देत हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि त्यांचाही या समितीमध्ये समावेश करावा अशा सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सरकारला दूपार पर्यंत हालचाल करणे बंधनकारक असणार आहे. मात्र संपाचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. कारण संप मिटवायचा की नाही याबाबतचा निर्णय सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय घेणार नाही अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. या संपामुळे आज राज्यातील २५० पैकी जवळपास २२० आगार बंद आहेत. परिणामी अमरावती, बुलढाणा उस्मनाबाद, सांगली, कोल्हापूर, पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड अशा महाराष्ट्रातील मोठ्या आगारांमधून एकही एसटी बाहेर पडलेली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या सुट्टीवरुन परत निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु असलेले दिसून येत आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकरला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी २९ ऑक्टोबरला मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.
यात एसटी कामगारांना २८ टक्के महागाई भत्ता देणे आणि वाढीव घरभाडे भत्ता देणे अशा मान्य काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या मात्र त्यानंतरही वार्षिक वेतनवाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण व्हावे या मागणीवर कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. प्रवाशांचे होत असलेले हाल पाहून मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचे घोषित केले. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले. मात्र त्याला कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.